गेल्या १८ जुलैपासून अधिक श्रावण महिना सुरु झाला आहे. खरे तर अधिक महिना ही अगदी साधी खगोलीय तरतूद आहे. ( इंग्रजी ) सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे तर (आपले ) चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. दरवर्षी हा फरक ११ दिवसांचा असतो. दर तीन वर्षांनी हा फरक ३३ दिवसांचा होत असल्याने तो दूर करण्यासाठी १ अधिक मास येतो. तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्याचे महत्व, व्रते, दानधर्म, ३३ वस्तूंचे दान, जावयाला दिले जाणारे दान या परंपरांबद्दल आपण थोडी माहिती करून घेऊ या …
या महिन्याला अधिक मास, मल मास, पुरुषोत्तम मास अशी नावे आहेत. तसेच वर्षातील महिन्यांच्या रांगेत मध्येच येणाऱ्या या महिन्याला धोंड्या / धोंडा महिना असेही म्हटले जाते. एरवी केली जाणारी शुभकार्ये, होमहवन, पूजा, व्रते अशा गोष्टी या अधिक महिन्यात वर्ज्य केल्या आहेत. त्यामुळे पूर्वी लोकांना जो अवसर मिळत असे त्यामध्ये कांही खास व्रते, पूजा, दानधर्म करून आजपर्यंत हातून झालेल्या पापांचे क्षालन करण्याची संधी आपल्या धर्मात करून दिलेली आहे.
हल्ली बाजारात त्वचेच्या cleansing साठी खूप क्रीम्स उपलब्ध आहेत. जाकुझी, सौना बाथ, निसर्गोपचार अशा मार्गांनी body cleansing केले जाते. आपल्या धर्माने उपास, आहार बदल, फक्त विशिष्ट आणि मोजकाच आहार अशा सोप्या आणि स्वस्त मार्गांनी body cleansing ची सोय करून ठेवलेली आहे. पूजा, व्रते, दानधर्म अशा गोष्टींनी spiritual cleansing ची सुद्धा उत्तम व्यवस्था केलेली आहे. मौनव्रत, मंत्रजप, स्तोत्रपठण, धार्मिक ग्रंथपठण अशा गोष्टींमुळे psychological cleansing होते. आपले मन आणि आहार यांची योग्य सांगड घालून जर या गोष्टी केल्या तर अधिक चांगले परिणाम मिळतात. दर ३ वर्षांनंतर एकदा येणाऱ्या अधिक महिन्याचे हेच वैशिष्ट्य आहे. अधिकमास येण्याच्या आधीच्या ३ वर्षांचे तरी पापक्षालन करून घ्या. स्वतःच स्वतःची काया – वाचा – मन शुद्धीकरण करा. अधिक महिन्यात पूर्वापार केली जाणारी व्रतवैकल्ये ही त्या त्या काळाशी सुसंगत अशी होती. आपण त्याचा योग्य अर्थ लावून आजच्या काळाशी सुसंगतपणे, आपल्या स्वतःच्या तब्येतीला झेपतील अशी आणि स्थानिक परिस्थितीशी मेळ घालून आपण करू शकतो. अधिक महिन्यात केलेल्या पुण्यकर्मांचे फळही नेहेमींपेक्षा अधिक असते असे मानले जाते.
अधिक महिना हा भगवान विष्णूचा महिना असे मानतात. या महिन्यात पूर्वापार काय काय व्रते केली जातात हे आपण पाहू या. पण या व्रतांमध्ये ठिकठिकाणी अनेक फरक / बदल आढळतात. दिवसाचा कांही काळ रोज मौनव्रत धारण करणे, रोज विशिष्ट वेळी देवळात जाणे, तेलवात लावणे, दान करणे, उपास करणे अशा अगदी साध्या गोष्टीही केल्या जात असत. देवाला रोज एकाच प्रकारची ३३ फुले वाहणे, पहाटे ब्राम्हमुहूर्तावर उठून भगवान विष्णूची पूजा करणे, विष्णुसहस्रनाम, विष्णुसूक्त म्हणणे या गोष्टी केल्या जातात. तांबूल, दीप, फळे, विडे, धान्य, वस्त्रे इ. यांचे दान केले जात असे. धारणे – पारणे असेही एक व्रत होते. यामध्ये एक दिवस पूर्ण उपास ( धारण ) करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पारणे करायचे. असे महिनाभर केले जात असे. अधिक महिन्यात रोज कितीही अल्प असले तरी कांहीतरी दान करणे, अल्प आहार घेणे, कुणाकडून काहीही न स्वीकारणे ( अयाचित ), सद्वर्तन, सत्यवचन अशा गोष्टींचा भविष्योत्तर पुराणामध्ये पुरस्कार केला आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूचा महिना म्हणून या संपूर्ण महिनाभर भगवतगीतेमधील १५ वा अध्याय वाचला जातो. जगाचा पालनकर्ता भगवान विष्णूच्या श्रेष्ठत्वाबद्दल, संसाराबद्दल, वागण्याबद्दलचे मार्गदर्शन या अध्यायात केलेले आहे. या अध्यायालाच ” पुरुषोत्तम योग ” असे म्हटले जाते. एक व्रत म्हणून या महिन्यात ३३ धाग्यांची ” अधिक मास वात ” भगवान विष्णुपुढे लावली जाते. आपल्या हाताच्या ४ बोटांच्या भोवती सुताचा एक फेरा याप्रमाणे १६ फेरे पूर्ण आणि अर्धा फेरा अशा १६।। फेऱ्यांची एक वात याप्रमाणे २ वाती मिळून ३३ फेरे होतात. वाती या नेहेमी जोडीने लावतात म्हणून या एकूण ३३ फेऱ्यांच्या जोडवातीचा तुपाचा दिवा भगवान विष्णुपुढे लावला जातो. पूर्वी माझ्या आजीकडून कळलेली एक सर्वात वेगळी वात म्हणजे ३३ फुलवातींपासून एकत्रित गुंफलेली ‘ वेणीमाधव ‘ वात ! वेणीमाधव म्हणजे ब्रह्मा – विष्णू – महेशचे एकत्रित रूप. त्याचे लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर आहे असे मानले जाते. अधिकमासामध्ये ही ( कृपया सोबतचा फोटो पाहावा ) सुंदर वात सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वी, माझी आजी देवापुढे लावत असे. या महिन्यातील आणखी एक वेगळी प्रथा — एरवी मुलगी कधीही आपल्या आईची / सासूची ओटी भरत नाही पण अधिक महिन्यात मुलीने आईची व सुनेने सासूची ओटी भरण्याची काही ठिकाणी पद्धत आहे.
या महिन्यात ३३ अंकाचे महत्व काय ?
खरेतर ३३ हा अंक हिंदू, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम अशा सर्व महत्वाच्या धर्मांमध्ये महत्वाचा मानला जातो. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा ३२ महिने १६ दिवस, आणि ८ घटींच्या नंतर म्हणजे सुमारे ३३ महिन्यांच्या नंतर येतो. या ३३ महिन्यांसाठी म्हणून ३३ वस्तूंचे दान केले जाते. याचा उल्लेख अनेकदा तीस – तीन असा केला जातो. कारण आपला पूर्ण महिना हा ३० च दिवसांचा असतो. त्यामुळे एखादा नेम / व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे ३ दिवस ते दिवसातून २ वेळा करून ३३ पूर्ण करावे लागतात.
अनारसे दान का केले जातात ?
या काळात अपूप दान केल्यास पृथ्वीदानाचे फळ लाभते असे मानले जात असे. अपूप म्हणजे अनरसा ! आपल्या शास्त्रात वटक म्हणजे वडा आणि अपूप म्हणजे अनरसा यांना कधीही शिळे अन्न मानले जात नाही. अनरसा हा सच्छिद्र / जाळीदार असतो. म्हणून मग कांही जण असाच जाळीदार असलेला मैसूर पाक किंवा बत्तासे दान करतात. या सोबतच विडा आणि दक्षिणा देण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात पूर्वापार, कांसे या धातूच्या थाळ्यातून अनारसे दान केले जातात.
या महिन्यात जावयाला दान का देतात ?
जावयाला विष्णुस्वरूप मानलेले आहे. पूर्वी आपल्याकडील लग्नामध्ये, वृद्ध माणसे सुद्धा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नवदांपत्याला लक्ष्मी नारायण म्हणून वाकून नमस्कार करीत असत. अनुरूप जोडप्याला तर ” लक्ष्मी नारायणाचा जोडा ” असे मानले जात असे. आजही अनेक जण एकादशीच्या उपासाचे द्वादशीला केले जाणारे पारणे, सत्यनारायणाची पूजा यासाठी दांपत्य भोजन यासाठी मुलगी आणि जावयाला निमंत्रित करतात. अधिक महिन्यात जावयाला दान देण्यामागे हाच विचार आहे. जावयाचा पर्यायाने आपल्या मुलीचा वंश वाढावा म्हणून वंशदर्शक असे दीपदान ( निरांजन ) केले जाते. याला एक विनोदी आणि सामाजिक बाजूही आहे. पूर्वीच्या काळात जावयाकडील मंडळी, मुलीच्या वडिलांकडून ( सासऱ्याकडून ) अनेक वस्तू सतत मागून घेत असत. अगदी लग्नपूर्व वाटाघाटींमध्ये किंवा लेखी करार करून सुद्धा आयत्यावेळी रुसणे, मागण्या करणे घडत असे. तरीदेखील ही मंडळी फारशी खूष नसत. पण आपल्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून सासरा बिचारा कांही ना कांही कारणाने सतत काहीतरी देतच असे. नऊ ग्रह जसे माणसाला त्रास देत असतात तसाच तेव्हा जावयाचा त्राससुद्धा होत असे. म्हणून ” कन्या” राशीतील ” जामाता दशमो ग्रह : ” म्हणजे जावई हा दहावा ग्रह आहे, म्हटले जात असे. या बद्दलचा मूळ श्लोकही फार मजेदार आहे….
सदा वक्रः सदा रुष्टः सदा पूजामपेक्षते । कन्याराशिस्थितो नित्यं जामाता दशमो ग्रहः।। आदित्याद्या ग्रहाः सवें यथा तुष्यन्ति दानतः।। सर्वस्वेपि न तुष्येत जामाता दशमो ग्रहः।।
अशा या जामात ग्रहाची शांती म्हणूनही अशी दाने केली जात असत. आज यामध्ये स्वागतार्ह बदल होत आहे. आता जावई हा पुत्र होतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
या अधिक महिन्यात व्रते, उपास, नेम करायचे की नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. आपल्या धर्मात कसलीही सक्ती नाहीये. पण जर करायचे असेल तर त्याची पूर्ण माहिती सगळ्यांना असतेच असे नाही. ” का ? कसे? ” याची उत्तरे मिळत नाहीत. म्हणूनच आपल्या परंपरा, धर्मशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र यांची सांगड घालणारी ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
या पुरुषोत्तम मासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !