नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहर आणि जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी तपासणी पथकांमार्फत धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सर्व दुध विक्रेते, स्वीटमार्ट धारक, किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतांना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी दिली आहे.
दंडात्मक कारवाई होणार
पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेल्या दुध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.