नाशिक/एनजीएन नेटवर्क
नियमांचे पालन न करणे खडीक्रशर चालकांच्या अंगलट आले आहे. कारण याच मुद्द्यावरून तालुक्यातील सारुळ, राजुर बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित १५ खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात २१ खडी क्रशरवर कारवाई करीत ते बंद केले होते. खडीक्रशर चालकांनी नियमांचे पालन केले नसल्याने ही कारवाई झाल्याचे सांगितले गेले. तथापि, या कारवाई विरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सुनावणी घेत उपरोक्त निर्णय दिला.
या नियमांची पायमल्ली ..
खाणपट्टेधारकांनी खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. खाण पट्ट्यात किती उत्खनन झाले, याची बहुतेकांनी दैनंदिन नोंद ठेवलेली नव्हती. खाणपट्टा परिसरात सीमांकन नव्हते. डोंगर-टेकडी फोडताना सहा मीटर नियम पाळला गेला नाही. खाणपट्ट्याचा करारनामा न करणे असे प्रकार उघड झाले. टेकड्यांचा चढ आणि उतार यावर गौण खनिजाचे उत्खनन करता येत नाही. अटी व शर्तीत ते नमूद असूनही त्या ठिकाणी उत्खनन झाले.
यांचे परवाने रद्द..
शुभांगी बनकर, सिरील रॉड्रिक्स, हरिभाऊ फडोळ, श्रीराम स्टोन क्रशर, गणेश स्टोन मेटल, भगवती अर्थ मुव्हर्स, फ्रानिस सिरील रॉड्रिक्स, हेमंत लठ्ठा, अनिलकुमार कन्स्ट्रक्शन, अर्जुन नवले, मोतिराम नवले, निर्माण बिल्डमेट आणि गजानन नवले