नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिकच्या सरकारी खात्यांतील लाचखोरी थांबता थांबत नाही. आता आदिवासी विकास विभागातील लेखा अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील वसतिगृह इमारतीचे 4 लाख 59 हजार 258 रुपयांचे थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांच्याकडे पाठवण्यासाठी लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर यांना 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या मालकीच्या इमारती आंबोली येथील दोन वसतिगृहांसाठी 2021 ते 2024 या भाडे कराराने दिलेल्या आहेत. इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे दोन लाख 93 हजार 994 रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे 1 लाख 656 हजार 264 रुपये असे एकूण चार लाख 59 हजार 258 रुपये थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवण्यापूर्वी लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांच्याकडे प्रलंबित होते. बिलांची पडताळणी करुन मंजुरीकरता सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना भास्कर जेजूरकर यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.