नाशिक/एनजीएन नेटवर्क
बांधकाम क्षेत्रात अव्वल दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या अशोका बिल्डकॉन लिमिटेडच्या वतीने आपल्या कर्मचारी वर्गासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. याच अनुषंगाने कंपनी अंतर्गत सुरक्षा निरीक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण वर्गाला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
अशोक बिझनेस एन्क्लेव येथे सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘अशोका’च्या मनुष्यबळ विकास आणि प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील सारना, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गीते, सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोका बिल्डकॉनच्या सुरक्षा रक्षक विभागाला कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी योजावयाच्या उपायांची मान्यवरांनी आपापल्या मार्गदर्शनात चर्चा केली. अशोकाच्या सर्वांगीण विकासामध्ये सुरक्षा रक्षक विभागाचादेखील महत्वपूर्ण वाटा आहे. आपला विभाग बळकट करण्यासाठी कंपनीने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण वर्गाबद्दल सहभागी निरीक्षक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.