सातपूर/एनजीएन नेटवर्क
शिवसेनेला दगा दिलेल्या चाळीस आमदारांमधून एकही निवडणुकीत निवडून येणार नाही. हा ३१ वर्षाचा तरुण तुम्हा सगळ्यांना नडणार आहे. चाळीस जणांना कोणत्याही परीस्थितीत घरी बसवायचे आहे. एकटा जरी राहिलो यांना घरी बसवणारच, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिला.
सातपूर येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शपथविधीनंतर एका गद्दराने निरोप पाठवत उद्धव साहेब एकटे कशासाठी आणि कोणासाठी लढत आहात, आमच्या सोबत या, लाल दिवा आहे, मंत्रिपद मिळेल. मी बोललो ‘मेरे पास जनता आहे’, महाराष्ट्राची माती आहे, महाराष्ट्राच्या मातीसोबत गद्दारी नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला शिवसेना सांगायची आहे. सध्या महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री दर आठवड्यात दोन दिवसांनी दिल्लीला जात आहेत. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे, कारण धोका तुम्हा आम्हाला नाही तर महाराष्ट्राला आहे. राज्यात राजकीय नेते फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत. शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज ऐकणारे कोणी नाही, महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचे नाही, असा घणाघात यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.