बंगळूरू/एनजीएन नेटवर्क
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
यानंतर काही दिवस आदित्य उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून, अंतराळात असणाऱ्या एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल. आदित्य उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर काही दिवस तो पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे. 18 सप्टेंबरनंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. आदित्यला आवश्यक तेवढी गती मिळण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
यानंतर हा उपग्रह L1 या लॅग्रेंज पॉइंटच्या हेलो ऑर्बिटमध्ये स्थापन करण्यात येईल. याठिकाणी सूर्याचं आणि पृथ्वीचं गुरूत्वाकर्षण एकमेकांना बॅलन्स करत असल्यामुळे, ही जागा महत्त्वाची आहे. याठिकाणी एखाद्या उपग्रहाला कायम ठेवण्यासाठी अगदी कमी इंधनाची गरज भासते. त्यामुळे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.