- पहिल्या पायरीवर हजारो दिव्यांची रोषणाई; पौर्णिमेच्या पर्वणीला भाविकांची मोठी गर्दी, ‘आई राजा उदे उदे’च्या जयघोषाने गड दुमदुमला!
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगड : रघुवीर जोशी
त्रिपुरी पौर्णिमा व देवदिवाळीनिमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर गुरुवारी भक्ती, श्रद्धा आणि प्रकाशाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. पहिल्या पायरीवर आयोजित दीपोत्सवात हजारो दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. दिव्यांची आकर्षक मांडणी, रांगोळ्या आणि सजावटीने पहिल्या पायरीचे रूप अधिकच खुलले होते. पौर्णिमेच्या पर्वणीला श्री भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गडावर हजेरी लावली. सप्तशृंगी माते की जय ‘आई राजा उदो उदो’, ‘जय सप्तशृंगी माता’च्या जयघोषाने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
पहिल्या पायरीवर दीपोत्सवाचा लखलखाट
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त पहिल्या पायरीवर हजारो दिव्यांची केलेली रोषणाई भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. दिव्यांच्या प्रकाशात न्हालेली पायरी, फुलांची रांगोळ्यांची सजावट आणि दीपमाळांनी परिसराचे सौंदर्य खुलून दिसत होते. या दीपोत्सवात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिव्यांच्या प्रकाशात भक्तिभावाने श्री भगवतीचे दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. अनेकांनी या मनोहारी क्षणांची छायाचित्रे व व्हिडिओ टिपून आठवणी जतन केल्या तर काहींनी रिल्स तयार केले.
पौर्णिमेच्या पर्वणीला दर्शनासाठी गर्दी
त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम दिसून आला. दीपोत्सवाचा आनंद घेत भाविकांनी आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सव आणि दीपावलीचा उत्साह ओसरल्यानंतरही गडावर सुरू असलेली भाविकांची वर्दळ धार्मिक व पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करत होती.
श्रद्धा, परंपरा आणि प्रकाशाचा उत्सव
त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर आविष्कार ठरला. हजारो दिव्यांच्या प्रकाशातून भक्तीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने भाविकांच्या मनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. दीपोत्सवाच्या तेजाने उजळलेला सप्तशृंगगड, भक्तांच्या जयघोषाने दुमदुमणारा परिसर आणि श्री भगवतीच्या दर्शनाने तृप्त झालेले भाविक, अशा मंगलमय वातावरणात त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा झाला.
Comments are closed.