NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या कुशल चोपडाची घोडदौड; भारतीय टे. टे. संघात निवड

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : कुशल चोपडा याची प्रतिष्ठित जागतिक युवा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २१ ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान इस्तंबूल, तुर्की येथे होणार आहे. या कामगिरीसह कुशल हा नाशिकमधून निवड होणारा पहिला मुलगा आणि तनिषा कोटेचा आणि सायली वाणी यांच्यानंतर जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवणारा नाशिक शहरातील तिसरा खेळाडू ठरला आहे.

कुशल चोपडा सोबत हे तीन खेळाडू पण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत: १) प्रियानुज भट्टाचार्य (आसाम), २)  पी. बी. अभिनंदन (तमिळनाडू), ३) मुथु बालमुरुगन (तामिळनाडू) 

कुशलची निवड ही त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचा पुरावा आहे. त्याने यापूर्वी ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आणि दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे. त्याने यापूर्वी ८ आंतरराष्ट्रीय पदके आणि २० हून अधिक राष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

त्याच्या कामगिरीतून केवळ त्याची प्रतिभा आणि समर्पणच दिसून येत नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिसचे उदयोन्मुख केंद्र म्हणून नाशिकची वाढती प्रतिष्ठाही दिसून येते. हा टप्पा नाशिकसाठी प्रचंड अभिमानाचा क्षण आहे. प्रशिक्षक जय मोडक यांचे मार्गदर्शनाखाली कुशल नियमित सराव करत आहे.

त्याच्या या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, उपाध्यक्ष राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, वैभव जोशी, सौ. अलका कुलकर्णी, सुहास आघारकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comments are closed.