NGN News
Latest Marathi News

मुले : आपला अनमोल ठेवा, उज्ज्वल भविष्याची आशा !

द्वारा : डॉ. ए. एफ. पिंटो, चेअरमन, रायन ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन

** एनजीएन न्यूज नेटवर्क


मुले ही मानवजातीला मिळालेली ईश्वराची सर्वांत अनमोल देणगी आहेत. त्यांचे निरागस हास्य, अमर्याद जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती आपल्या जीवनात आनंद, आशा आणि नव्या संधींची ऊर्जा निर्माण करते. भविष्याची केवळ प्रतीक्षा करायची नसते, तर आजच्या बालपिढीचे योग्य संगोपन, शिक्षण आणि संस्कार करून ते घडवायचे असते, याची जाणीव मुले आपल्याला करून देतात. बालदिन साजरा करताना आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रेमाने स्मरण करतो. लहान मुलांवरील त्यांचे अपार प्रेम आणि जिव्हाळा हा मुलांमध्येच आपल्या राष्ट्राचे खरे भविष्य घडविण्याची क्षमता आहे, या त्यांच्या दृढ विश्वासाचे प्रतीक होता.

रायन अँड झेवियर्स ग्रुपमध्ये आम्ही नेहमीच शिक्षणाकडे केवळ शैक्षणिक यश मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता, प्रत्येक मुलामधील सुप्त गुण आणि क्षमता ओळखून त्यांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगभूत कौशल्यांना वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि आयुष्यभर उपयोगी पडतील अशी मूल्ये रुजविणे, हे आमच्या शिक्षणपद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा किंवा यशस्वी करिअरसाठी तयार करणे एवढीच आमची जबाबदारी नसून, त्यांना जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे. संवेदनशील माणसे, जबाबदार नागरिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रायन ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या गौरवशाली प्रवासाकडे पाहताना, आमच्या विद्यार्थ्यांना कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जागतिक स्तरावर सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये विकसित होताना पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वांत मोठी उपलब्धी आणि समाधानाची बाब आहे.

वेगाने बदलणाऱ्या जगात मुलांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चयाने प्रयत्न करावेत आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने व आत्मविश्वासाने सामोरे जावे, यासाठी आपण त्यांना प्रेरित केले पाहिजे. स्वतःची आवड ओळखणे, आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत राहणे, इतरांचा आदर करणे तसेच दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सहानुभूती यांसारखी मूल्ये आचरणात आणणे, यामुळे त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनेल आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होईल.

या बालदिनानिमित्त प्रत्येक मुलाला त्याची क्षमता पूर्णपणे विकसित करता यावी, यासाठी आवश्यक असलेले प्रेम, मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन देण्याचा संकल्प आपण सर्वांनी पुन्हा एकदा करूया. कारण जेव्हा आपण एखाद्या मुलाचे प्रेमाने आणि काळजीपूर्वक संगोपन करतो, तेव्हा आपण अधिक उज्ज्वल, संवेदनशील आणि आशादायी भविष्याचा पाया रचत असतो.

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य सदैव असेच खुलत राहो, शिकण्याची जिज्ञासा कायम राहो, स्वप्नांना नवी उंची मिळो आणि तुमचे व्यक्तिमत्त्व नेहमीच तेजाने उजळत राहो. लक्षात ठेवा, तुम्ही केवळ आपल्या राष्ट्राचे भविष्य नाही, तर राष्ट्राची आशा, ताकद आणि उज्ज्वल जगाची खरी प्रेरणा आहात.

सर्व प्रिय बालमित्रांना बालदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Comments are closed.