NGN News
Latest Marathi News

नाशिक जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

  • ई-मेलने खळबळ!  न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहनांची कसून तपासणी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. राज्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा न्यायालयात धाव घेत सुरक्षेचा आढावा घेतला. धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाच्या आतील आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यायालयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त
बॉम्बने न्यायालय उडवून देण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक व नाशक पथकासह पोलिसांकडून न्यायालय परिसराची तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, न्यायालयात येणाऱ्या नागरिकांची तसेच वाहनांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे.

दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि धमकीमध्ये कितपत तथ्य आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. राज्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी धमकीचे ई-मेल आल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.