NGN News
Latest Marathi News

बागलाणमधील भाविकांवर राजस्थानात काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू

  • अजमेर सौंदाणे येथील भाविकांच्या वाहनाला कंटेनरची धडक; पहाटेच्या सुमारास भीषण अपघात;

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा : श्रीकांत रौंदळ

राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या अजमेर सौंदाणे (ता. बागलाण ) येथील मगर कुटुंबीयांच्या वाहनाचा जयपूर जवळील एका टोल नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला .या अपघातात वाहनातील 30 जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात नऊ दहा महिन्याच्या तीन बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे अजमेर सौंदाणे गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार मगर कुटुंबीय सोमवार पासून राजस्थान येथे आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान अजमेर -जयपुर रस्त्यावर जयपूर जवळील एका टोल नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास एका कंटेनरने त्यांच्या वाहनास जबरदस्त धडक दिली. या अपघातात संदीप रामसिंग मगर(५०) दीपक त्र्यंबक मगर 65) आणि महेश विजय सिंग मगर (४५)यांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाहनातील काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत झालेले तिघेही सख्खे चुलत भाऊ आहेत.

दरम्यान या अपघाताची माहिती समजताच अजमेर सौंदाणे गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गावचे पोलीस पाटील रणजीत पवार यांनी या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातातील जखमींची प्रकृती आणि दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राजस्थान येथील राजपूत समाजाच्या करणी सेनेने अपघातातील मृतदेह व अन्य जखमींना गावी पाठविण्याची व्यवस्था केलेली असून रविवारी पहाटेपर्यंत गावी पोहोचतील अशी माहिती अजमेर सौंदाणे येथील काँग्रेसचे रवींद्र बापू पवार यांनी दिली. या अपघातातील दीपक मगर सेवानिवृत्त कृषी अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा व मुलगी आहेत. महेश मगर यांच्या पश्चात आई वडील व दोन मुले आहेत. तर संदीप मगर यांच्या पश्चात आई व दोन मुले आहेत.

महाजन यांचा राजस्थान राज्यपालांशी संपर्क

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मदतकार्याच्या अनुषंगाने पुढाकार घेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अपघातातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली.

तसेच अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तातडीने चांगल्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य आणि दर्जेदार उपचार करण्यात यावेत, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही विनंती मंत्री महाजन यांनी केली. मंत्री गिरीश महाजन यांच्या या संपर्कानंतर राजस्थानच्या राज्यपाल कार्यालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे स्पष्ट केले. अपघातातील जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांच्या उपचारांसाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून मंत्री महाजन यांना देण्यात आली.

Comments are closed.