
- अवघ्या दहा महिन्यांत जलदगती न्यायालयाचा निकाल; पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई देण्याचे आदेश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने २१ वर्षीय विजय खैरनार या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी खैरनार याने साडेचार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी या संदर्भात निकाल देत शिक्षा सुनावली आहे. दुर्मिळतील दुर्मिळ घटना असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तर पीडितेच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. तर आरोपी विजय खैरनार व त्याचे वकील व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. निकालावेळी पीडितेचे कुटुंबीय, मंत्री दादा भुसे यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटना पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील कोर्टाच्या परिसरात उपस्थित होते. तर पीडितेकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्यासह ॲड. स्नेहा शर्मा ठाकरे, ॲड. संजय सोनवणे यांनी काम बघितल्याची माहिती आहे. तर आरोपीकडून ॲड.राठी यांनी कामकाज बघितले. आता आरोपीला उच्च न्यायालयात ३० दिवसांच्या आत दाद मागता येऊ शकते, अशी देखील माहिती आहे.
प्रकरण नेमके काय ?
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात साडेचार वर्षीय चिमुरडीवर विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज ( दि.१६ ) तब्बल दहा महिन्यानंतर या घटनेचा मा.अपर जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव येथे पोक्सो जलदगती न्यायालयात न्याय निर्णय देण्यात आला आहे. अतिशय घृणास्पद व निंदनीय कृत्य करणाऱ्या विजय खैरनार या नराधमाला आज मा.न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावणार की फाशी ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. अखेर न्यायालयने या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सुरुवातीस २३ दिवसांत ४२५ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात आतापर्यंत पोलीस, ग्रामस्थ, पिडीताचे कुटुंब, वैद्यकीय अधिकारी आदीं २४ साक्षीदार तपासण्यात आलेले असून शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भक्कम पुराव्याच्या आधारे मा.न्यायालयात मांडणी केली आहे.
दरम्यान, मागील सुनावणीत आरोपी विजय खैरनार याचेवर दोष निश्चिती करण्यात आलेली असून न्यायालयाने त्याचे म्हणणे मांडण्याची देखील संधी त्याला उपलब्ध करून दिली होती. तसेच पोलीस, मानसोपचार तज्ञ व जेलर यांचेकडून त्याचे वर्तणुकीबाबत अहवाल कोर्टात सादर करण्यात आले होते.
उच्च व सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही प्राधान्याने व्हावी : डॉ. नीलम गोऱ्हे
दरम्यान, अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी विजय खैरनार याला मालेगाव न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले. अशा गंभीर प्रकरणांतील उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीही प्राधान्याने व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “ही घटना अत्यंत धक्कादायक आणि अमानुष होती. या गुन्ह्यातील क्रौर्यामुळे समाजमन सुन्न झाले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेला तपास, संकलित केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद यामुळे गुन्हा सिद्ध होऊ शकला. तपास अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सरकारी वकिलांच्या कामगिरीचे मी कौतुक करते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.”
“सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयातील शिक्षेच्या पुष्टीची प्रक्रिया आणि पुढील अपिलांवरील सुनावणी वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला दीर्घकाळ लागल्यास पीडित कुटुंबाच्या वेदना आणि अस्वस्थता वाढते. त्यामुळे बालिकांवरील अत्याचार व हत्या यांसारख्या गंभीर प्रकरणांतील पुढील सुनावणी प्राधान्याने होण्यासाठी स्वतंत्र जलदगती व्यवस्था असावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“कठोर शिक्षेच्या निर्णयासोबतच पुढील कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला आणि मानसिक आधारालाही प्राधान्य दिले पाहिजे. न्यायासाठीची त्यांची प्रतीक्षा अनावश्यकपणे लांबू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
Comments are closed.