वॉशिंग्टन/एनजीएन नेटवर्क
सुमारे ८० टक्के भारतीयांचा दृष्टिकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असून अलीकडच्या काळात देश अधिक शक्तिशाली झाल्याचे १० पैकी सात भारतीयांना वाटत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’ या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचे समोर आले आहे. जगभरात सरासरी ४६ टक्के नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत ३४ टक्के जग प्रतिकूल आहे. १६ टक्के लोकांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. यामध्ये इस्रायलमध्ये भारताबाबत सर्वात चांगले मत असून तेथील तब्बल ७१ टक्के नागरिक हे भारताची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे मानतात. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने फेब्रुवारी २०२० ते मे २०२२ या काळात २४ देशांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ३० हजार ८६१ जणांनी सहभाग नोंदविला. भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार १०पैकी आठ नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील ५५ टक्के लोकांनी ‘अतिशय सकारात्मक’ असल्याचे मत नोंदविले आहे. मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.