सातपूर/एनजीएन नेटवर्क
बनावट बँक खाते उघडून बनावट कागदपत्रांच्या आधारे कारखान्याच्या नावे परस्पर दुसरे खाते उघडून कर्मचाऱ्यांनी मालकाला अडीच कोटींना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. यासंदर्भात, सात कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितनुसार, जगदिश साबू (रा.हिरावाडी, पंचवटी) यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीत कारखाना आहे. कारखान्यातील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या संशयितांनी नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कारखान्यात उत्पादित मालाच्या व्यवहारातील रकमेचा तसेच बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर कारखान्याच्या नावे सातपूर येथील सेंट्रल बँकमध्ये खाते उघडून हा अपहार केला. यात तब्बल दोन कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रुपयांचा संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित कर्मचारी अमोल पवार, भूषण पवार, सागर पाटील, आकाश वारूंगसे, निरज खेडलेकर, देवेंद्र शर्मा आणि विशाल पवार यांच्याविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.