NGN News
Latest Marathi News

मिशन स्कॉलरशिपला माजी विद्यार्थ्यांची साद; ७९ विद्यार्थ्यांना ५० हजारांची मदत

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या ‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमाला श्रीराम विद्यालय, पंचवटीच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इगतपुरीचे मदतमित्र व मानवेढे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे इगतपुरी बीटातील १२ जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता चौथी व सातवीच्या ७९ विद्यार्थ्यांना नवनीत प्रकाशनच्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शिका देण्यात आल्या.

बीट विस्ताराधिकारी प्रमोद चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गाईड्सचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही करण्यात आला. मानवेढे शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी हर्षदा माळी हिने इंग्रजीतून प्रभावी मनोगत व्यक्त केले. तिच्या उत्कृष्ट वक्तृत्वाबद्दल पाहुण्यांनी तिला ५०० रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.

यावेळी श्रीराम विद्यालय पंचवटीचे माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे, केंद्रप्रमुख संजय बोरसे आणि विस्ताराधिकारी प्रमोद चिंचोले यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अनिल शिरसाठ यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत दुर्गम भागातील शाळांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू असलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

Comments are closed.