मुंबई/एनजीएन नेटवर्क
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी सरकारकडून मान्य झाली आहे. त्यानुसार, एखाद्या गोविंदाचा खेळताना अपघाती मृत्यू झाला किंवा त्याचा दोन अवयव किंवा दोन्ही डोळे गमवावे लागले तर, त्याच्या कुटुंबीयांना किंवा त्याला १० लाखांची मदत मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमाविल्यास ५ लाखांची मदत मिळणार आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाखांची मदत मिळणार आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होत असतात. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो. गोविंदांचा १ लाख रुपयांपर्यंतचा रुग्णालयातील उपचारांचा खर्चही विमा संरक्षणातून केला जाणार आहे. सदर विमा संरक्षणाचा लाभ राज्यातील ५० हजार गोविंदांना होणार असून, त्यासाठी लागणारा प्रत्येकी ७५ रुपयांप्रमाणे ३७ लाख ५० हजार रुपयांचा विमा हप्ता महाराष्ट्र राज्य दहीहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.