नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत असले तरी दक्षिण द्वीपकल्पात अद्यापही पाऊस पोहोचला नाही. नैऋत्य मान्सूनने देशाच्या बहुतांश भागांना झपाट्याने व्यापले आहे. बिपरजॉय या शक्तिशाली चक्रीवादळाचा प्रभाव संपताच, मान्सून गंगेच्या मैदानात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
जूनच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे, देशातील एकूण पावसाची कमतरता १० दिवसांपूर्वीच्या -५१ टक्क्यांवरून दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या -१९ टक्क्यांवर आली आहे. परंतु ही आकडेवारी दिलासा देणारी नाही. कारण, बिहार, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालसारख्या राज्यांचा समावेश असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात अजूनही पावसाची तूट कायम आहे. इथं शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची तयारी करत आहेत. पण कमी पावसाने बळीराजा चिंतेत आहे.
देशभरातील एकूण ३६ उपविभागांपैकी २० उपविभागात अजूनही पावसाची कमतरता आहे. हा उपविभागीय प्रदेशात भारताच्या तब्बल ४७ टक्के भूभागाचा समावेश आहे. ज्यामध्ये बिहार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गंगा पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पावसाची तूट वाढून -७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ती -५० टक्क्यांहून अधिक आहे. जून महिना संपण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. अशात या सर्व चार राज्यांमध्ये गेल्या वर्षीही मान्सून सरासरीपेक्षा कमी होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती चिंतेची आहे. सिंधू-गंगेच्या मैदानी भागासांठी चांगला मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण, इथे लोक खरीप पिकांना सिंचन करण्यासाठी मोसमी पावसावर जास्त अवलंबून असतात. चार महिन्यांचा हंगाम (जून ते सप्टेंबर) देशातील वार्षिक पर्जन्यमानाच्या ७० टक्के पुरवण्यासाठी जबाबदार आहे, ज्याचा जीडीपी शेतीवर चालतो.