NGN News
Latest Marathi News

सिलिंडरचा काळाबाजार; सातपूरला कारवाईत 447 सिलिंडर जप्त

  • पुरवठा विभागाचा पवित्रा ; सात जणांविरोधात गुन्हा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभागाने छापा टाकत तब्बल 447 सिलिंडर जप्त केले. पोलिसांच्या सहाय्याने केलेल्या कारवाईत जप्त सिलिंडर आणि इतर मुद्देमालाचे मूल्य २५ लाखांच्या घरात आहे. सातपूर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारासंदर्भातील कायद्यांतर्गत एकूण सात जणांविरोधात गुन्हा नोंदवत चौकशीचा फास आवळला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात अनेक तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालेलं असताना जिल्हा पुरवठा विभागाला सातपूर परिसरात असा प्रकार होत असल्याची कुणकुण लागली. या माहितीच्या आधारे त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातपूर पोलिसांसह नाईस संकुल परिसरात सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला.

तपासणीदरम्यान 158 भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण 447 सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 25 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित एजन्सी चालकाने आपण काळाबाजार करत नसून सिलिंडर गोडाऊनमध्ये नेण्यासाठी वाहतूक करत असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. 

Comments are closed.