NGN News
Latest Marathi News

सटाण्यात मतदार याद्यांमध्ये ३९३७ दुबार नावे; कारवाईची मागणी

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेला ३९३७ नावे दुबार नोंदविण्याचा प्रकार हा थेट लोकशाहीचा खून आहे, अशी तीव्र टीका करत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सटाणा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष भारत काटके व कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी चोकलिंगम यांची भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.काटके व श्री.सोनवणे बोलत होते. ते म्हणाले, सटाणा नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, ८ ऑक्टोबरपासून मतदार याद्यांवरील हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत काही मतदार माफियांनी प्रत्येक प्रभागात आपापल्या नातेवाईक, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांची नावे मोठ्या प्रमाणात नोंदवून ठेवली आहेत. अनेक नागरिकांची दोन ते तीन ठिकाणी नावे नोंदविण्यात आली असून, काही प्रभागामध्ये ४०० ते ५०० बनावट मतदारांची नावे आढळून आली आहेत. एकट्या सटाणा नगरपरिषद निवडणुकीमध्ये ३९३७ नावे दुबार नोंदवली गेली आहेत.

काही गटांचे षड्यंत्र

निवडणूक जिंकण्यासाठी बनावट मतदार तयार करण्याचे षड्यंत्र काही गटांनी रचले असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. निवडणूक शाखेतील काही अधिकारी, बीएलओ व कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय अशा प्रकारे हजारो दुबार नावे नोंदवली जाणे शक्यच नाही. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा इशाराही शहराध्यक्ष काटके व कार्याध्यक्ष सोनवणे यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगरसेवक मुन्ना शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.