सटाणा/एनजीएन नेटवर्क
केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्याचा निषेध करीत आज बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार, राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण,केशव मांडवडे,शिवसेनेचे लालचंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या अध्यादेशाची होळी करीत येथील बाजार समितीसमोरील सटाणा–मालेगाव राज्य महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले.
आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त शेतकर्यांसह कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी विरोधी निर्णय घेणार्या मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी केली. शासनाच्या ४० टक्के निर्यातशुल्क वाढीच्या निर्णयाचे बागलाण तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. आज सकाळी दहा वाजता या निर्णयाच्या निषेधार्थ बाजार समितीसमोरील सटाणा – मालेगाव राज्य महामार्गावर बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे अचानक रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शेतकर्यांकडून हा निर्णय घेणार्या मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने नेहमीच शेतकरी विरोधी धोरण राबविले असून आता कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा तुघलकी निर्णय घेताना गारपीट, अवकाळी आणि दुष्काळाशी सामना करणार्या बळीराजाला आर्थिक खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. वर्षभरापासून दर ढासळल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीस आले होते. आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला असताना शेतकर्यांना दोन पैसे मिळणार होते. मात्र शेतकरी विरोधी सरकारने निर्यातशुल्क लावून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवकाळी व गारपीटीमुळे होत्याचे नव्हते झाले. पिकवलेला कांदा पावसात भिजून खराब झाला, तर उर्वरीत ५० टक्के कांदा चाळीमध्ये सडला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाण्याची गरज असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्यावर सोडले आहे. २०२४ च्या निवडणुकीत या मोदी सरकारला शेतकरी घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही. सरकारने हा अन्यायकारक तुघलकी निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा शेतकर्यांच्या सोबत घेऊन रस्त्यावर आंदोलने छेडण्याचा संतप्त इशाराही माजी आमदार सौ.चव्हाण यांनी दिला.
माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले, कुणाचीही मागणी नसताना कांदा निर्यातशुल्कात वाढ करून शेतकर्याला आर्थिक खाईत लोटण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने उत्पादक शेतकरी अश्रु ढाळत होता, खर्चही निघत नसल्याने कांदा मातीमोल भावाने विकावा लागत होता. तेव्हा केंद्र सरकार कुठे गेले होते. आता कांदा उत्पादकांना जास्त भाव मिळाला तर मोदी सरकारच्या पोटात दुखण्याचे कारण काय? मातीमोल दराने कांदा विक्री होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याचा विचार बळावला असताना दहाच दिवसात केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून बळीराजाला संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, काँग्रेसचे शाम सनेर, शहराध्यक्ष किशोर कदम, संजय पवार, पोपट सोनवणे, राजेंद्र पवार आदींची भाषणे झाली. आंदोलनात बाजार समितीचे संचालक संजय बिरारी, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष रविंद्र सोनवणे, पांडुरंग सोनवणे, विजय वाघ, साहेबराव सोनवणे, डॉ.विठ्ठल येवलकर, राजेंद्र खानकरी, सुमित वाघ, राजनसिंह चौधरी, वंदना भामरे, उषा भामरे, शमा दंडगव्हाळ, अनिल सोनवणे, अरुण सोनवणे, ज.ल.पाटील, दादू सोनवणे, सुयोग अहिरे, निखिल खैरणार, नितिन सोनवणे, पप्पू शेवाळे, लक्ष्मण सोनवणे, देविदास सोनवणे, केवळ सोनवणे, सुनील गायकवाड आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.