सटाणा/एनजीएन नेटवर्क
शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चातील एका गटाने केलेल्या दगडफेक प्रकरणात आतापर्यंत ४३ संशयितांसह वंचित बहुजन आघाडी, आदिवासी जनकल्याण पक्ष आणि इतर आदिवासी संघटनांच्या ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना रविवारी सटाणा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शनिवारी मोर्चाचा समारोप झाल्यानंतर एका टोळक्याने दोधेश्वर नाक्याजवळ ठिय्या दिला. पोलिसांनी त्यांची समजूत घालूनही ते ऐकेनात म्हणून सौम्य लाठीमार करण्यात आल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमावाने राज्य परिवहनच्या बससह खासगी वाहनांवर दगडफेक करून नुकसान केल्याने पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये सहायक उपनिरीक्षक यशवंत भोये, हवालदार रायसिंग जाधव, अजित देवरे, योगेश साळुंखे, विलास मोरे, अशोक चौरे, हरी शिंदे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.