कोल्हापूर/एनजीएन नेटवर्क
अवघ्या तीन वर्षांची जागतिक विक्रमवीर अन्वी चेतन घाटगे हिने नुकतेच कळसुबाई शिखर दुसऱ्यांदा सर केले आहे. समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. मूळची हातकणंगले तालुक्यातील नेज येथील असणारी अन्वी चेतन घाटगे ही फक्त 3 वर्षे 11 महिन्यांची गिर्यारोहक आहे. गतवर्षी 1 जुलै 2022 रोजी अन्वीने फक्त 2 वर्षे 11 महिन्यांची असताना पहिल्यांदा कळसुबाई शिखर सर केले होते.
तिच्या या असाधारण कामगिरीची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड् आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड् मध्ये झाली आहे. तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने देखील तिला ‘यंगेस्ट माऊंटेनियर’ हा किताब दिलेला आहे. अन्वीने नुकतेच तिची आई अनिता, वडील चेतन आणि प्रा. अनिल मगर यांच्यासह दु. 01.30 च्या सुमारास कळसुबाई सर करण्यास सुरवात केली. मुसळधार पाऊस, दाट धुके, तसेच प्रंचड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी सामना करत साधारणपणे सायं. 04.30 वाजता ती शिखरावर पोहचली. 02 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम घाटातील रतनगड (समुद्रसपाटीपासून 4300 फूट) हा चढाईस अत्यंत कठीण गड अन्वीने सर केला. रतनगड हा मुसळधार पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, फसव्या व निसरड्या झालेल्या वाटेवरुन आणि वेगाने वाहणारे आठ ते दहा ओढे पार करत, घनदाट जंगलातून अन्वीने ही मोहीम पूर्ण केली आहे. केवळ 3 वर्षे 11 महिन्यांच्या वयामध्ये रतनगड सर करणारी अन्वी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. त्याबाबत नेचर हंट ॲडव्हेन्चर संस्थेचे अध्यक्ष रवी झाडे यांनी तसे प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान केला आहे. तसेच सलग दोन दिवसात कळसुबाई शिखर व रतनगड सर करणारीही अन्वी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.