जळगाव/एनजीएन नेटवर्क
बदली रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तब्बल 75 हजार रुपयांची लाच घेताना जळगावस्थित श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या एरंडोल येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्यासह मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव आणि लिपिक नरेंद्र उत्तम वाघ हे तिघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कुल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार व सहकारी उपशिक्षक अशा दोघांची बदली धरणगाव येथे करण्यात आल्याबाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता. नंतरच्या काळात दोघांच्याही बदलीस स्थगिती मिळाली. यासाठी अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक विनोद जाधव, लिपिक नरेंद्र वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष अध्यक्षांसह दोघांसाठी दोन्ही शिक्षकांचा पूर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना 75 हजार रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्षांनी लाच देण्यासाठी दोघा शिक्षकांना प्रोत्साहन दिले व मागणी केल्याप्रमाणे 75 हजार रुपयांचा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय 42) यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले