NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अरेरे ! ‘समृद्धी’वर अग्नितांडव; बस पेटल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

0

बुलढाणा/एनजीएन नेटवर्क

समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.  रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

ओळख पटवणेही कठीण

बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे अशीही माहिती समोर आली आहे.

मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांची मदत

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमके काय घडले, याची चौकशी तर होईलच. मात्र, मी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तशाप्रकारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांची ओळख पटवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबांना सरकार ५ लाख रुपयांची मदत देईल,” अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.