नाशिक/एनजीएन नेटवर्क
शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 15) डोंगरे वसतिगृह मैदान होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून 25 हजार लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने सर्व यंत्रणांनी लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देवून कार्यक्रमातील आपली जबाबदारी योग्यरितीने पूर्ण करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या नियोजनाची नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितीनकुमार मुंडावरे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, नाशिक महानगरपालिका अपर आयुक्त प्रदीप चौधरी, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फुड पॅकेट्स, स्वच्छतागृह, त्यांची आसन व्यवस्था याबाबत काटेकोर नियोजन करून कोणत्याही लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. कार्यक्रम स्थळी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे 40 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कौशल्य विकास विभागामार्फत कार्यक्रम स्थळी सकाळी 10 वाजेपासून आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यात साधारण 50 आस्थापनांच्या 4 हजार 500 रिक्त जागांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सकाळी 10 वाजेपासून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहेत तालुकानिहाय लाभार्थी…
नाशिक शहर व नाशिक ग्रामीण येथून प्रत्येकी 5 हजार लाभार्थी 150 सिटी लिंक बसेसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी येणार आहेत. तसेच निफाड येथून 1 हजार 500 लाभार्थी 30 एसटी बसेस, देवळा 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, पेठ 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, त्र्यंबकेश्वर दोन हजार लाभार्थी 40 एसटी बसेस, नांदगांव 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, दिंडोरी दोन हजार लाभार्थी 40 एसटी बसेस, सिन्नर 1500 लाभार्थी 30 एसटी बसेस, येवला 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, मालेगाव दोन हजार लाभार्थी 40 एसटी बसेस, इगतपुरी एक हजार 500 लाभार्थी 30 एसटी बसेस, सुरगाणा 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, बागलाण 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, कळवण 500 लाभार्थी 10 एसटी बसेस, चांदवड एक हजार लाभार्थी 20 एसटी बसेस यानुसार जिल्हाभरातून एकूण 25 हजार लाभार्थी 450 बसेसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी येणार आहेत. यावेळी सुरगाणा, पेठ, कळवण व दिंडोरी या चार तालुक्यातून येणाऱ्या बसेस श्रद्धा लॉन्स जवळ तर इतर तालुक्यातून येणाऱ्या बसेस ईदगाह मैदान येथे थांबविण्यात येणार आहेत.