बंगळूरू/एनजीएन नेटवर्क
भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला शिवशक्ती म्हणून संबोधले जाणार, अशी घोषणाही त्यांनी केली
चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरू येथे जावून इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, तुम्ही केलेल्या कामाची माहिती देशवासियांना मिळाली पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचं सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडर उतरवून त्याची चाचणी घेण्यात आली. इतक्या परीक्षा देऊन मून लँडर तिथे सुखरुप पोहोचलं, त्यामुळे त्याला यश मिळणार हे निश्चित होते. आज जेव्हा मी पाहतो की, भारतातील तरुण पिढी सायन्स, स्पेस आणि इनोवेशन या संदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, त्यामागे हेच यश आहे.
चांद्रयान 3 या मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉइंट भारताच्या या संशोधकांच्या प्रयत्नांचा साक्षीदार म्हणून कायम राहील. हा शिवशक्ती पॉइंट येणाऱ्या पिढींना प्रेरणा देत राहील.आपल्याला विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करायचा आहे. मानवतेचं कल्याण हीच आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. येत्या काळात शिवशक्ती पॉईंट जगाला प्रेरणा देत राहील, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संबोधनात आणखी एक घोषणा केली आहे. 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून साजरा केला जाईल, असं ते म्हणाले. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. याच दिवशी विक्रम लँडर चंद्रावर लँड झाले. या दिवशी प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून आला. देशातील हा जल्लोष अवघ्या जगाने पाहिला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल, असंही मोदी म्हणाले.