नाशिक/एनजीएन नेटवर्क
श्रावण मास व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज रविवारी ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेचे आयोजन नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. या परिक्रमेत 205 सायकलिस्टने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विशेष म्हणजे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित या आगळ्यावेगळ्या परिक्रमेत डोंबिवली, पुणे ,वैजापूर, देवळा, सटाणा या ठिकाणा वरून देखील रायडर्स सहभागी झाले.
महापालिका माजी शहर अभियंता यू. बी .पवार सर यांच्या संकल्पनेतून या राईडची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदाचे हे ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेचे 11 वे वर्ष होते. सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली, तरी देखील सर्व रायडर्स वेळेवर सकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदान येथे पोहोचले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या राईड ला सुरुवात झाली. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, बजरंग कहाटे, माजी अध्यक्ष किशोर माने हे उपस्थित होते. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त सपत्नीक या राईडमध्ये सहभागी झाले. बम बम भोले, हर हर महादेव या जयघोषात राईड सुरू झाली. सर्व त्रंबक रोड सायकलिस्टने दुमदुमून गेला. सुंदर निसर्गरम्य वातावरणात, पावसाच्या आगमनामुळे सायकलिस्ट ला अधिकच ऊर्जा मिळाली. ठिकठिकाणी हायड्रेशन पॉईंट ची व्यवस्था केली होती. भक्ती व शक्ती या दोघांचा मेळ असणारी ही सायकल परिक्रमा खरोखर भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. विशेष म्हणजे पर्वतावर अहिल्या गौतम ऋषी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत, त्या मार्गात सायकल खांद्यावर उचलून घ्यावी लागते. स्वतः विभागीय आयुक्तांनी देखील सायकल खांद्यावर उचलून परिक्रमा पूर्ण केली. महिला व जेष्ठ सायकलिस्टने सुद्धा ही आव्हानात्मक राईड पूर्ण केली. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.
नाशिक -अंजनेरी – पहिने- कोजुली – अहिल्या गौतम ऋषि मंदिर -सापगाव फाटा -त्र्यंबकेश्वर नाशिक असी ही 76 कि.मी. ची राईड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बारामती सायकलिस्ट क्लबच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आकर्षक मेडल देण्यात आले. हा कार्यक्रम परतीच्या मार्गावर ग्रेप कांउटी येथे घेण्यात आला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, भारती गमे ,सायकलप्रेमी किरण चव्हाण व सुवर्णा चव्हाण यांच्या हस्ते मेडल प्रदान केले. ही राईड यशस्वीरित्या आयोजन व नियोजन करण्यासाठी यु. बी. पवार, माजी उपाध्यक्ष जे .एस. पवार ,संचालक दीपक भोसले, भाऊसाहेब काळे यांनी अथक परिश्रम घेतले