नाशिक/एनजीएन नेटवर्क
बालवयात योग शिक्षक म्हणून कार्य करणे, योगाचा प्रचार व प्रसार करणे तसेच मोठ्यांना योगाचे धडे देणे अशी कामगिरी करणाऱ्या देशभरातील बाल योग शिक्षकांना ‘द ध्रुव रत्न’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये नाशिकच्या १५ वर्षीय आदित्य पराग पटणी याचा समावेश असल्याने, नाशिककरांसाठी हा मोठा बहुमान ठरला आहे.
युवा खेलकुद महहासंघ, नीती आयोग व भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आग्रा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. आदित्य वयाच्या दहाव्या वर्षापासून योग शिक्षक व एरियल स्पोर्ट्स ट्रेनर म्हणून काम करीत आहे. नुकतेच आदित्यने व त्याची बहीण गीतने नाशिकमध्ये योगशी संबंधित उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते. भारत सरकारकडून योगाचा समावेश ‘युवा खेल-कुद’ अंतर्गत क्रीडा प्रकारात केला असून, त्याला प्रोत्साहन देण्यासाठीच याबाबतच्या पुरस्काराचे आयोजन केले होते. त्यामध्ये नाशिकच्या आदित्य पटणीने बाजी मारल्याने, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.