पुणे/एनजीएन नेटवर्क
चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे आमीष दाखवून एका नृत्यशिक्षकाने १५ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकवणाऱ्या एका शिक्षकाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात बलात्कार व ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ येथील एका डान्स अकॅडमीमध्ये तो नृत्य शिकवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटी शेजारी, मांजरी बुद्रुक) असे आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय विद्यार्थी काळेपडळ येथील डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकत होती. तेथे सुशील नृत्य शिकवत होता. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमीष दाखवले आणि तिला वेगवेगळ्या लॉजवर नेले. तेथे आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याने या मुलीवर अत्याचार केले. मुलीच्या आईला संशय आल्याने तिने पाठलाग करून एका लॉजवर या दोघांना पकडले. या प्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने आरोपी विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.