मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातील शाळांचा विकास करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 13 ऐतिहासिक गावांमधील 13 शाळांचा कायापालट होणार आहे. त्यासाठी सरकाराने तब्बल 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. नाशिकमधील कुसुमाग्रज शाळेचा यामध्ये समावेश आहे.
राज्यातील महापुरुषांशी संबंधित 13 शाळांच्या विकासासाठी तब्बल 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगरच्या चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अमरावतीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, अमरावतीच्या शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख, कोल्हापूरची राजर्षी शाहू महाराज आणि नाशिकमधील कुसुमाग्रजांची शाळा यांचा कायापालट होणार आहे.
आ. बनकर यांची मागणी मान्य ..
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार दिलीप बनकर यांनी कुसुमाग्रजांची पहिली ते चौथीपर्यत शिक्षण झालेल्या प्राथमिक विद्या मंदिराच्या विकासासाठी निधी मिळण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी एक कोटी रूपयांचा विकासनिधी देण्याची घोषणा करण्यात आली. पिंपळगावच्या प्राथमिक शाळेच कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. सध्या जुनी इमारत मोडकळीस आली असून धोकादायक स्थितीत आहे. निधीची घोषणा झाल्याने इमारतीसह उद्यान व पायाभूत सुविधा शाळेच्या प्रांगणात उभारता येणार आहे.