ठाणे/एनजीएन नेटवर्क
राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा 108 रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरली आहे. तथापि, ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे दहा वर्षांपासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक 108 वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. मात्र, या विषयावर अद्याप देखील तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील 108 रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती समोर आली आहे.
. बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले होते. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 25 जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत एक बैठक घेत त्यांच्या मागण्याबाबत योग्य विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता महिना होत आले असले तरी देखील वाहनचालकांसोबत कोणतीही चर्चा बीव्हीजी कंपनीने केली नाही. कंपनीच्या या भूमिकेवर संतापलेल्या महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहनचालक संघटनेने 1 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.